पुणे – निवासी मिळकतींचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांच्या शोधासाठी महापालिकेने व्हॉट्स ऍप क्रमांक जाहीर केला होता. मात्र, त्यावर गेल्या पाच महिन्यांत अवघ्या 138 तक्रारी आल्या आहेत. तर, तपासणीअंती दहापेक्षाही कमी मिळकतींच्या वापरात बदल केल्याचे समोर आले. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी पालिकेने शोधलेला उपाय फसल्याचे बोलले जात आहे.
मागील वर्षी प्रशासनाने सुमारे 15 हजार अशा मिळकती शोधल्या होत्या. दरम्यान, अशा मिळकतींना व्यावसायिक कर आकारणी केल्याने महापालिकेचे उत्पन्न जवळपास 100 कोटी रुपयांनी वाढणार होते. त्यामुळे ही मोहीम व्यापक स्वरुपात राबवण्यासाठी पालिकेने व्हॉट्स ऍप क्रमांक जाहीर केला होता. त्याबाबत जनजगृतीही करण्यात आली होती.
वैयक्तिक वादाच्या तक्रारीच अधिक
महापालिकेच्या व्हॉट्स ऍप क्रमांकावर अनेक तक्रारी या वैयक्तिक वादातून देण्यात आल्याचे समोर आले आहे. तक्रार आल्यानंतर मिळकतीची तपासणी केली असता, अनेक मिळकतींना यापूर्वीच व्यावसायिक कर लावल्याचे समोर आले. काही ठिकाणी शेजाऱ्यांकडून एकमेकांच्या भांडातून तक्रारी करण्यात आल्या आहेत.