जुन्या आठवणी तरळल्या ; बारामतीत प्रशस्त मॉल उभा राहणार
बारामती – बारामतीकरांना रुपेरी पडद्याचे दर्शन घडवणारी दुर्गा टॉकिज वास्तूच्या जागेवर प्रशस्त मॉलसाठी नवीन वास्तू उभारण्यात येणार आहे. पूर्वीची दुर्गा टॉकीज व सध्याची दुर्गा सिटी प्राईड ही वास्तू जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीकरांसाठी करमणुकीचे हक्काचे ठिकाण असणारी ही वास्तू आता काळाच्या पडद्याआड झाली आहे.
टॉकीज उभारल्यापासून दर्शनी भागात ही सुंदरी नृत्यमुद्रेत उभी आहे. मध्यंतरी दुर्गा टॉकिजचे रुपांतर दुर्गा सिटी प्राईडमध्ये झाले. नूतनीकृत वास्तूतही अबाधित राहिली. फक्त तिचं सौंदर्य खुलवणारी मागील बाजूची भलीमोठी सिमेंट ग्रील (जाळी) नाहीशी झाली. आता सुंदर वास्तूवर अनेक दिवसांपासून पोकलेनच्या सहाय्याने घाव घालण्यात आले. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला ही वास्तू पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली आहे.
बारामतीच्या वैभवात अनेक वर्षापासून भर घालून बारामतीकरांसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे मनोरंजन करणारे दुर्गा टॉकीज हे थिएटर नामशेष झाल्याने बारामतीकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हळहळ व्यक्त केली. शहरातील सामाजिक कार्यकर्ते उदय कुलकर्णी यांनी वास्तूबद्दल भावना कळकळीने मांडल्या.
बारामतीचे सांस्कृतिक संचित असलेली ही वास्तू करंदीकर कुटुंबीयांनी उभारली. बाळासाहेब वाघ यांनी याविषयी आठवणी, सांगितल्या. 1969- 70 मध्ये एक गाव बारा भानगडी सिनेमाच्या प्रदर्शनाने याची वाटचाल सुरु झाली. तीन, सहा, नऊचे रेग्युलर शो त्याकाळी होते. बाराचा मॅटिनी शो हा शाळा कॉलेजला दांडी मारुन सिनेमा पाहणाऱ्यांच्या आवडीचा होता.
खिशाला परवडणारा हे जास्तीचं आकर्षण होते. इंग्रजी सिनेमांचे मॉर्निंग शो सुरु झाले. त्याची पोस्टर्स अनेकांची घालमेल वाढविणारी होती. मॉर्निंग मॅटिनी हा चोरीचा मामला होता. मुख्य शोला उत्सुकतेने उघड चर्चा चालायची. नवीन सिनेमाची रंगवलेली भलीमोठी पोस्टर्स पहायला गर्दी जमत होती.
गावकऱ्यांचा ओढा
कामानिमित्त खेडेगावातली मंडळी बारामतीला आली की आवर्जून सिनेमाला जात होती. तिकीट दर एक रुपयांपासून पाच पैसे, एक रुपयांपासून पस्तीस पैसे आणि बाल्कनी एक रुपये पासष्ट पैसे होते. जुन्या काळात बदल होत गेले. खायला बाहेर येऊन चणे- फुटाणे आणायचे. दुर्गा टॉकिजला कवलगीकर हे मॅनेजर होते. माधवराव पाटील, विजय सोनवणे, उद्धव धोकटे, महंमदभाई ही मंडळी अजूनही लक्षात आहेत. तिकीटासाठी वशिला लावायचा प्रयत्न करीत होते. दर्शनबारीप्रमाणे फिरत जाणाऱ्यांची तिकीट काढणे ही कलाच होती.
करोनानंतर आशा मावळली
दुर्गा टॉकिजचे काही वर्षांपूर्वी आधुनिकीकरण केले. मात्र, करोनानंतर दुर्गा सिटी प्राईड बंद राहिले. त्यानंतर हे थिएटर सुरू होईल, अशी आशा बारामतीकरांना होती. मात्र, ती निराशाच ठरली. या जागेत नवीन मालक मॉल बांधले जाणार आहे.