शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे १ जानेवारी या दिवशी विजयस्तंभ शौर्य दिनी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे नगर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
कोरेगाव भीमा येथे पेरणेफोटा येथील पुणे नगर महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक दि.३० रोजी सायंकाळी ५ पासून ते १ जानेवारी २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यत पर्यत बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक खालील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलिसांनी दिले आहेत. शिक्रापूर ते चाकण व चाकण ते शिक्रापूर अशी जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
अहमदनगर बाजूकडून पुणे व मुंबई बाजूकडे येणारी जड अवजड व इतर वाहने ही शिरुर ते न्हावरा फाटा नंतर न्हावरातून पारगाव केडगाव चौफुलामार्गे यवत सोलापूर रोडने हडपसर यामार्गे पुणेकडे येतील. तर पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड अवजड व इतर वाहनेही पुणेमार्गे खराडीतून हडपसरमार्गे सोलापूर हायवे रोडने केडगाव चौफुलाहून पारगावमार्गे न्हावरा ते शिरुरमार्गे अहमदनगर रोड, अशी जातील.
मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड अवजड व माल वाहतूक वाहने वडगाव मावळमार्गे तळेगाव दाभाडे ते चाकण, खेड, नारायणगावहून आळेफाटामार्गे अहमदनगर अशी जातील. मुंबई व ठाणेकडून नगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने त्यामध्ये कार, जीप आदी वाहने वडगाव मावळमार्गे तळेगाव दाभाडेहून चाकण ते खेड, पाबळ तसेच शिरुरमार्गे नगरकडे जातील. याप्रमाणे पेरणे व कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांसाठी शिथील राहणार आहे.