मंचर – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील गायमुख ते भोरवाडी रस्त्यावर आठवड्यात दोन वेळा शाळकरी विद्यार्थ्यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तींनी स्प्रे मारल्याच्या घटना घडल्या असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत विद्यार्थी व पालकांना धीर देत कोणी संशयस्पद व्यक्ती आढळल्यास मंचर पोलीस ठाण्याची संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
अवसरी येथील श्री भैरवनाथ विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही घटना घडली आहे. शनिवारी (दि. 7) वेदांत सचिन भोर (वय 11, 5 वी) हा मुलगा शाळेत जात असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन व्यक्तींनी त्याच्या हातावर स्प्रे मारला आणि ते निघून गेले. बुधवारी (दि. 11) प्रणाली अजय तांबडे (वय 14, 8 वी) ही विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीबरोबर शाळेत येत असताना दोन दुचाकीवर आलेल्या चार जणांपैकी एका दुचाकीवरील व्यक्तीने तिच्या तोंडावर स्प्रे मारला.
यावेळी तिच्याबरोबरच्या मैत्रिणींनी आरडाओरडा केल्याने दुचाकीस्वार निघून गेले. याबाबत श्री भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य डी. डी. जाधव यांनी मंचर पोलीस ठाण्यात माहिती दिली असून मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान नंदकुमार आढारी, अविनाश दळवी, शेखर भोईर यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा करत पाहणी केली आहे.
आठ दिवसात दोन प्रकार
दुचाकीवर आलेलल्या व्यक्ती कुठल्या आहेत, कोठून येत आहेत किंवा कशासाठी हा प्रकार करीत आहेत, याबाबतची अद्याप कुठलीही खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. मात्र, आठ दिवसांत दोन वेळा हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शक्यतो पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे
स्प्रे मारल्यानंतर शरीराला खाज येऊन सूज येण्याचे प्रकार घडत असल्याचे विद्यार्थ्यांचे पालक सांगत आहेत. या स्प्रे मारणाऱ्या व्यक्तींचा उद्देश समजला नसून अवसरी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकजुटीने शाळेत यावे. रस्त्याला, घराच्या आजूबाजूला कोणतीही अनोळखी व्यक्ती दिसल्यास पालकांना, पोलीस पाटील, मंचर पोलीस यांना कळवावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, शक्य असल्यास पुढील काही दिवस पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे, असे आवाहन मंचर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.