ज्ञानेश्वर फड/एम. डी. पाखरे
आळंदी –
नारा विठा गोंदा महादा पाठविला ।
झाडविली जागा समाधीची ॥
हरिदिनीं जागर केला निशीदिनीं ।
उदईक पारणीं द्वादशींची ॥
गंगा गिरजा राही रुक्माबाई भामा ।
उठिल्या रांधण्या पारण्याच्या ॥
नाना प्रकारचे पाक ते अपार ।
मुनि ऋषीश्वर बोलाविले ॥
वैष्णव देव आणि आले सुरगण ।
करोनियां स्नान इंद्रायणी ॥
पिंपळाचे पारीं बैसविल्या पंक्ती ।
पात्रें ते श्रीपती वाढूं लागे ॥
नामा म्हणे देवा करणें साहित्यासी ।
येतो कासाविसी प्राण माझा ॥
माऊली… माऊली… माऊलीचा जयघोष, आकर्षक फुलांनी सजविलेला रथ, त्यामध्ये विराजमान माऊलींचा चांदीचा मुखवटा म्हणजे साक्षात माऊलीच.. हा सुखसोहळा डोळ्यामध्ये साठविण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले भाविक असा वैभवी रथोत्सव द्वादशीला रविवारी (दि. 10) सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.
तत्पूर्वी पहाटे पवमान अभिषेक व दुधारती झाल्यानंतर खेडचे प्रांतअधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचे हस्ते माऊलींची पंचोपचार पूजा झाली. मुक्ताई मंडपात नांदेडकर मंडळींची दिंडी क्र.15 यांचेतर्फे काकडा भजन श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, सायंकाळी रथोत्सव वीणा मंडपात हरिभाऊ बडवे यांच्या तर्फे कीर्तन सेवा, केंदूरकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा झाली त्यानंतर रात्री 11 ते 12 खिरापत पूजा, प्रसाद वाटप होऊन श्रींच्या गाभार्यात फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले.
अनेक भाविक परतीच्या वाटेवर
कार्तिकी एकादशीला (दि. 9) तीर्थक्षेत्र आळंदीत तीन लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते. एकादशीच्या दिवशी दिवसभर आळंदीतील सर्वच रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. रात्री कीर्तन, हरिजागर करून सकाळी द्वादशीचे भोजन करून अनेक भाविक गावी परतले. खरेतर श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांचा संजीवन समाधी सोहळा हा प्रमुख सोहळा आहे; मात्र बहुतांश भाविक द्वादशीलाच गावी परतात. तर वारकरी फड परंपरेचे भाविक वारकरी हे समाधी सोहळा झाल्यानंतर तसेच समाधी सोहळ्याच्या दुसर्या दिवशी काला करून परततात.
विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा –
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा सोमवारी (दि. 11) 727 व्या संजीवन समाधी सोहळ्याची माऊली मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली असून ‘विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा’ असे नाव फुलांमध्ये तयार करण्याचे काम आणि इतर सजावटीचे काम रात्रीपर्यंत सुरु होते.
आजचे कार्यक्रम –
कार्तिक वद्य 13/14 त्रयोदशी वार सोमवारी (दि. 11) पहाटे 3 ते 4 पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी 5 ते 9.30 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, सकाळी 7ते 9 हैबतबाबा पायरी पुढे हैबतबाबा आरफळकर यांच्या तर्फे कीर्तन, सकाळी 7 ते 9 विणा मंडपामध्ये कीर्तन, सकाळी 7 ते 9 भोजलींग काका मंडप येथे दाणेवाले निकम दिंडी यांचे कीर्तन, सकाळी 9 ते 12 नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन, दुपारी 12 ते 12. 30 वाजता 726 वा संजीवन समाधी दिनानिमित्ताने घंटा नाद.
पुष्पवृष्टी व आरती मान्यवरांना नारळ प्रसाद, दुपारी 12. 30 ते 1 महानैवेद्य, सायंकाळी 6.30 ते 8. 30 विणा मंडपात सोपान काका देहूकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा, रात्री 8. 30 ते 9 धुपारती, रात्री 9. 30 ते 11. 30 कारंजा मंडपामध्ये हरिभाऊ बागडे व पंढरी केसरकर यांच्यातर्फे भजन, रात्री 12 ते 4 हैबतरावबाबा आरफळकर यांचेतर्फे जागर.