दत्त जयंती उत्साहात साजरी : मंदिरात राजकीय नेत्यांची मांदिआळी
नीरा – दिगंबरा…दिगंबरा…श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात आणि भजनाच्या साथीने जेऊर (ता.पुरंदर) येथील श्री दत्त मंदिरामध्ये मंगळवारी (दि.26) श्रीदत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सद्गुरु सांगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सलग सात दिवस जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन दत्त मंदिरात दर्शन घेतले व कोटी नाम यज्ञ सोहळा समाप्ती कार्यक्रमात सहभाग घेतला.
जेऊर येथे दरवर्षी दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दत्त जयंती महोत्सवानिमित्त जेऊर येथील दत्त मंदिरामध्ये सद्गुरू सांगळे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठ दिवसांपासून विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं होते, यामध्ये 13 कोटी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ नाम जप यज्ञ आयोजित करण्यात आला होता. या यज्ञाची सांगता मंगळवारी दुपारी करण्यात आली.
यावेळी राज्याचे माजी मंत्री शशिकांत शिंदे, पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप यांनी भेट दिली. सायंकाळी सवा सहा वाजता दत्त जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. यावेळी सद्गुरू सांगळे महाराज यांचे दत्तजन्म अख्यानावर फुलांचे कीर्तन झाले. यानंतर दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पाळणा गायन, सुटवडा वाटप करण्यात आले त्याचबरोबर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.