व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीत उपक्रम
यवत – यवत (ता. दौंड) येथे नवीन चालू झालेले व्यंकटेश मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेला यवत जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनच्या विद्यार्थ्यांनी भेट देत बँकिंग कामकाजाच्या कार्यप्रणालीची माहिती घेतली.
विद्यार्थी दशेमध्ये असताना विद्यार्थ्यांना बँकिंगसह व्यवहाराचे ज्ञान यावे, यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे अनुभव घेत बँकेचे कामकाज कशा पद्धतीने केले जाते. बँक खाते कसे उघडायचे, खात्यांचे प्रकार, खाते उघडण्यासाठी अर्ज कसा भरावा, पैसे भरणा स्लिप, काढणे, याबाबत सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
चेकचे प्रकार, चेक कसा भरावा यासह लॉकर, तिजोरी प्रत्यक्ष दाखवून माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच आर्थिक बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. बँकेच्या वतीने त्यांना दिनदर्शिका भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी व्यंकटेश मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे विभागीय अधिकारी प्रवीण यादव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोनचे मुख्याध्यापक एम. एम. शिंदे, शिक्षीका उज्वला रंधवे, शाखा व्यवस्थापक मयूर कुंभार, पालक, विद्यार्थी, खातेदार, ग्रामस्थ उपस्थित होते.