मंचर : पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यावर अज्ञात दहा ते बारा तरुणांनी हल्ला करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. 2) सकाळी 10 च्या सुमारास एकलहरे (ता. आंबेगाव) येथे घडली आहे. बांगर यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
याबाबत प्रभाकर बांगर यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की, ते आणि त्यांचे सहकारी वनाजी बांगर हे विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथे ऊस दराबाबत बैठक असल्याने सकाळी दुचाकीवर जुन्नर येथे जाण्यासाठी निघाले होते.
दहाच्या सुमारास दहा ते बारा तरुणांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना एकलहरे येथे थांबवून रस्त्याच्या बाजूला नेऊन तरुणांनी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि देवेंद्र शहा यांच्या विरोधात बोलतो का, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी प्रभाकर बांगर यांचा वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी सांगितले.
सहकारमंत्र्यांच्या अवमानप्रकरणी नऊ जणांवर शिरूरमध्ये गुन्हा
जांबूत – पिंपरखेड (ता. शिरूर) येथे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या फोटो पोस्टरला चपलेने मारून दहन केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभाकर गोपाळ बांगर, वनाजी बजरंग बांगर (रा. मंचर, ता. आंबेगाव), माऊली ढोमे, सतीश बोंबे, बन्सी पोखरकर, नरेश सोनवणे, शांताराम वरे, तुळशीराम बोंबे, मुरलीधर बोंबे (रा. पिंपरखेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
भीमाशंकर साखर कारखान्याने उसाला 3300 ते 3400 रुपये प्रति टन बाजारभाव जाहीर करावा याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाअध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्याकडून उपोषण करण्यात आले होते. भीमाशंकर कारखान्याने दिलेला अंतिम 3100 रूपये हप्ता आम्हाला मान्य नाही.
भाग विकास निधीच्या नावाखाली शेतकऱ्यांची इच्छा नसतानाही अंतिम हप्त्यामधून केलेली 50 रुपयांची कपात करून लबाडी केली. दिलेला शब्द न पाळत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलकांची खिल्ली उडवली असून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. आम्ही गावागावात जाऊन त्यांच्या सभा उधळवून लावू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला होता.
यानंतर प्रशासनाची परवानगी न घेता गर्दी जमवून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या फोटोचे पोस्टर बनवून त्यावर चपलेने मारून फोटो पोस्टर पेटवून दिल्याने शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई विशाल कचरू पालवे (रा. शिरूर) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.