पुणे -करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले सर्वाधिक बाधित होण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासन जिल्ह्यात लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र बेड्स, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर सुविधा उभारत आहे.
आतापर्यंत पुणे शहरासह जिल्ह्यातील 82 रुग्णालयांमधून 7 हजार 939 बेड्सची सुविधा केली आहे. त्याचबरोबर अन्य सुविधा युद्ध पातळीवर उभारण्यात येत आहे.
पुणे शहरात लहान मुलांच्या उपचारासाठी 53 रुग्णालयांमध्ये एकूण 5 हजार 971 हून अधिक बेड्स उपलब्ध करून दिले आहे. तर 252 आयसीयू बेड्स आणि 82 व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, घरकुल कोविड केअर सेंटर आणि खासगी रुग्णालये असे मिळून 1 हजार 691 बेड्स, 138 आयसीयू बेड्स आणि 66 व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध केले आहेत.
पुणे जिल्ह्यातील औंध जिल्हा रुग्णालय, आंबेगाव तालुक्यातील जम्बो कोविड सेंटर, श्रीमती काशीबाई नवले रुग्णालय, बारामती उपजिल्हा, बारामती शासकीय रुग्णालय, इंदापूर, भोर,
दौंड आणि मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय यांसह मावळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 202 बेड, 108 ऑक्सीजन बेड, पीआयसीयू बेड्स 74 आणि 20 व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध केले आहे.
मोठ्या रुग्णालयासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील ग्रामीण रुग्णालयांमध्येही लहान मुलांच्या उपचारासाठी बेड्स उपलब्ध करण्यात आले आहे.
त्यामध्ये शिरूर, मावळ, मुळशी, दौंड, खेड, वेल्हा, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 50 बेड्स, 20 ऑक्सिजन बेड, 20 पीआयसीयू बेड आणि 10 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करण्यात आले आहे.
नगरपालिका कार्यक्षेत्रातील पुरंदर, जुन्नर, इंदापूर, शिरूर आणि खेडमधील ग्रामीण रुग्णालयातही व्यवस्था केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यातील 15 खासगी रुग्णालये पूर्ण क्षमतेने लहान मुलांसाठी प्रस्तावित करण्यात आल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.