मेष : “केल्याने होत आहे रे’ ही म्हण लक्षात ठेवून कामात प्रगती करा. व्यवसायात भावनेच्या आहारी न जाता व्यवहारी बना. प्रकृतीमान सांभाळून नवीन कामे स्वीकारा. कामात निष्काळजी झालेली सहन होणार नाही. दगदग-धावपळ जास्त होईल. नोकरीत सहकाऱ्यांची कामात मदत होईल ही अपेक्षा ठेवू नका. स्वयंसिद्ध राहा. पैशाचे व्यवहारात चोख राहा. मनाविरुद्ध वागावे लागले तरी रागावू नका. घरात तडजोडीचे धोरण फायदेशीर ठरेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. पाहुण्यांची ये-जा राहील.
वृषभ : कामात यशस्वी वाटचाल कराल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. आपलेच म्हणणे खरे हा खाक्या सोडून सामंजस्याने प्रश्न हाताळा. लाभ होईल. पैशाचा विनियोग योग्य कारणासाठीच करा. अनावधानाने झालेली चूक पुढे महागात पडेल. तरी सावधगिरी बाळगा. नोकरीत आपले काम बरे की, आपण बरे हे धोरण ठेवा. गैरसमजुतीने होणारे वाद टाळा. धावपळ कमी करून तब्येत सांभाळा. घरात इतरांचे विचार समजून घेऊन वागा. घरगुती प्रश्न धसास लागतील. चांगल्या बातमीने मन आनंदी बनेल.
मिथुन: द्विधा मनःस्थिती राहील. तरी चिंता, काळजी नको. व्यवसायात दक्ष राहून घेतलेले निर्णय उपयोगी पडतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सभोवतालच्या व्यक्तींवर बारीक नजर ठेवावी. उत्साहाच्या भरात जादाची कामे स्वीकारू नका. नोकरीत तुम्हाला वरिष्ठ व सहकारी आवळा देऊन कोहळा काढणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मनाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या. घरात न चिडता स्वतःचे म्हणणे इतरांना पटवून द्या. मोठ्यांचा सल्ला आवश्यक तेथे घ्या. मुलांच्या प्रगतीबाबत अपेक्षित बातमी कळेल.
कर्क : मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलाल. व्यवसायात पैशाचे कितीही नियोजन केले तरी खर्च प्रमाणाबाहेर झाल्याने तुम्हाला चणचण भासेल. हितचिंतक, बॅंका यांचेकडून खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीत मानसिक अस्वस्थता राहील. वरिष्ठांना कितीही काम केले तरी समाधान नसेल, त्यामुळे कामाचा आळस येईल. घरात ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. विचार पटले नाही तरी न चिडता कृतीतून व्यक्त करा. झालेला विरोध सहन होणार नाही, तरी मौनव्रत ठेवावे.
सिंह : मनाप्रमाणे कामे होतील त्यामुळे उत्साही राहाल. व्यवसायात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्या. कामाचे योग्य नियोजन केले तर लाभ होईल. नवीन कामे मिळतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत सहकारी व वरिष्ठ कामात मदत करतील. गोड बोलून कामे करून घ्या. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. घरात वैचारिक मतभेद होतील. मुलांच्या प्रगती व प्रकृतीबाबत माहिती कळेल. पाहुणे, नातेवाईक यांची ये-जा राहील.
कन्या : तुमच्या कामात तुम्ही दक्ष राहता. पण त्यात इतरांनी केलेली ढवळाढवळ तुम्हाला सहन होत नाही. तेव्हा न रागवता कामे उरका. व्यवसायात वेळेचे गणित मांडून त्याप्रमाणे कामांना प्राधान्य द्या. फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन मार्गी लावा. नोकरीत काही कामांत तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागेल. कामातील बेत गुप्त ठेवावे लागतील. घरात सभोवतालच्या व्यक्तींकडून विचित्र अनुभव येईल. ठरवलेले कार्यक्रम बदलावे लागतील. त्याचा जास्त विचार करू नका. आप्तेष्टांच्या भेटीने आनंद मिळेल.
तूळ : ग्रहांची मर्जी हळूहळू राहील तेव्हा कासवाच्या चालीने प्रगती होईल. व्यवसायात निष्णात व्यक्तींचा सल्ला घेऊन कामे केलीत तर लाभ होईल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील त्यासाठी जादा अधिकारही देतील. परदेशी व्यवहाराच्या कामांना अपेक्षित गती येईल. घरात मुलांच्याविषयी थोडी चिंता वाटेल; परंतु भावना व व्यवहार यांची गल्लत करू नका. समजुतीचे घोटाळे होण्याची शक्यता आहे तरी शांत राहा.
वृश्चिक : आर्थिक दिलासा देणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. नको त्या कामात बराच वेळ जाईल. दुर्लक्ष केलेल्या कामांकडे लक्ष देऊन ती वेळेत पूर्ण करावी लागतील. नोकरीत तुमच्या मताला मान मिळेल. वरिष्ठ व सहकारी यांना तुमची गरज भासेल. कामानिमित्ताने प्रवास योग. घरात प्रत्येक व्यक्तींशी जमवून घेणे कठीण जाईल. अनावश्यक खर्च वाढल्याने चिडचिड होईल. जुने प्रश्न पुन्हा डोके वर काढतील तेव्हा सामंजस्याने सोडवा. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल.
धनू : स्वच्छंदी जगणे हा तुमचा स्थायीभाव आहे त्याचा अनुभव येईल. वातावरणाची साथ मिळेल. व्यवसायात कार्यतत्पर राहून कामे केलीत तर यश मिळेल. आर्थिक चिंता मिटेल. अनपेक्षित लाभ होतील. मनोबल उत्तम राहील. नोकरीत बोलण्याचा गैरफायदा सभोवतालच्या व्यक्ती घेणार नाहीत याची काळजी घ्या. कामापुरतेच संबंध ठेवणे हितावह राहील. घरात तटस्थ राहून लक्ष ठेवा. वादाचे प्रसंग टाळा, कुटुंबासमवेत छोटीसी सहल काढाल. प्रकृतीची साथ उत्तम मिळेल. स्वतःच्या छंदात मन रमविता येईल.
मकर : अत्यंत चाणाक्ष बुद्धीने तुम्ही सभोवतालच्या व्यक्तींवर मात करता त्याचा लाभ हाईल. व्यवसायातील व्यवहारी दृष्टिकोन भविष्यात लाभ देईल. पैशाचे व्यवहारात काटेकोर राहा व ओळखीतून नवीन कामे मिळवा. नोकरीत तुम्ही दिलेल्या सूचनांचा विचार वरिष्ठ करतील व त्याची अंमलबजावणीही करतील. महत्त्वाचे निर्णय घेताना तुमचे मत विचारात घेतील. प्रतिष्ठा वाढेल. दगदग, धावपळही वाढेल. घरात वागण्या-बोलण्याचे तंत्र सांभाळा. दगदग, धावपळीमुळे प्रकृतीची हेळसांड करू नका. एखादी आनंदाची बातमी कळेल.
कुंभ : तुम्ही मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जीवाचे रान करता. वेळ, काळ न बघता कामात स्वतःला झोकून देता. याचा लाभ होईल. व्यवसायात तडजोडीचे धोरण ठेवलेत तर केलेल्या कामाचे समाधान मिळेल. भावनेच्या भरात एखादा चुकीचा निर्णय घेऊ नका. पैशाचे बाबतीत चोख राहा. नोकरीत वरिष्ठांच्या बोलण्याचा मतितार्थ समजून घ्या व त्याप्रमाणे कृती करा. हलक्या कानाने विनाकारण गैरसमज होण्याची शक्यता आहे. घरात कामात वेळ जाईल. मनःस्वास्थ्य राहील. चांगली बातमी कळेल.
मीन: पाण्यात राहून माशांशी वैर करता येत नाही, हे लक्षात ठेवा. व्यवसायात आपमतलब साध्य करण्यासाठी शत्रूलाही गोंजारावे लागते, हेही लक्षात ठेवा व त्याप्रमाणे वागा. कामाची आखणी योग्य करून त्याप्रमाणे कृती करा. पटले नाही तर शांत राहा. नोकरीत हटवादी राहून वैर पत्करू नका. पैशाच्या मोहमायी पाशापासून दूर राहा. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नका. घरात विचारपूर्वक निर्णय घ्या. स्वतःच्या मर्यादा ओळखा. खर्चावर बंधन ठेवा. तरुणांनी अतिविश्वास बाळगू नये.
अनिता केळकर
( लेखिका- ज्योतिषतज्ञ्)