गुणवत्तास्तर निश्चिती पात्रात : कामशेत येथे पुरस्काराने केला गौरव
आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी देवाची गुणवत्तास्तर निश्चितीमध्ये पात्र होऊन विद्यालयास अ श्रेणी प्रदान करण्यात आली.
शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असून समाजास उपयुक्त लोकशाहीप्रती निष्ठा असलेले नागरिक घडविण्यासाठी सर्व शिक्षण व्यवस्था कार्यरत आहे. या कार्यामध्ये निकोप स्पर्धा होऊन सातत्याने गुणवत्तेचा आलेख चढता रहावा यासाठी शिक्षण विभाग (माध्य.) जिल्हा परिषद पुणे मार्फत गुणवत्तास्तर निश्चिती कार्यक्रम 2022 -23 पुणे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यान्वित करण्यात आला.
हा स्तर निश्चिती ही उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल, इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा निकाल, एनटीएस (नॅशनल टॅलेंट सर्च) परीक्षा निकाल, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, सारथी शिष्यवृत्ती, इन्स्पायर अवार्ड सहभाग व निवड,
चित्रकला स्पर्धा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट), राज्य व राष्ट्रीय (कला, क्रीडा, सांस्कृतिक) स्पर्धा सहभाग या घटकावर करण्यात आली. या सर्व घटकांच्या आधारावर मूल्यांकन करून उत्कृष्ट कार्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण 34 शाळांना गुरुवारी (दि. 18) कामशेत येथे सन्मानित करण्यात आले. यात ज्ञानेश्वर विद्यालयाचा समावेश आहे.
यानिमित्ताने प्राचार्य दीपक मुंगसे यांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आलेला सन्मान चिन्ह व पुष्प पुरस्कार संस्था व शाळेच्या वतीने स्वीकारला. या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर व संस्था पदाधिकारी यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.