पुणे – बेल्हे येथील माजी सभापती सदाशिव बोरचटे यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. या टोळीचा मुख्य सूत्रधार शिवनेरी एसटीच्या पुणे-नाशिक बसचा चालक आहे. यामध्ये त्याच्या मुलगाही सहभागी आहे. दरोड्यासाठी वापरलेली दोन चारचाकी वाहने जप्त केली आहेत. मात्र, चोरीच्या सोन्याची दरोडेखारांनी विल्हेवाट लावल्याने ते हस्तगत करता आले नाही.
गुन्हे शाखेने नाशिक व मध्यप्रदेशात एकाचवेळी छापे टाकत आरोपींना अटक केली. यामध्ये ठाणे ग्रामीण येथून इर्शाद नईम शेख (28 रा. पंचक जेल रोड, नाशिक) व त्याचे वडील नईम चांद शेख (52) यांना ताब्यात घेतले, तर मध्यप्रदेश येथून मोहम्मद हनीफ अल्ला बंदखान (62 रा. खाजराणा इंदोर) शुभम रामेश्वर मालवीय ( 24, रा. गादेशहा पिपालिया, ता. जि. देवास) रहमान फजल शेख (34, रा. जेल रोड नाशिक) लखन बाबुलाल कुंडलिया (30 रा. रसलपूर, ता.जि.देवास) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
फिर्यादी माजी सभापती सदाशिव बोरचटे यांच्या घरावर दि.19 डिसेंबरला दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. घरातील सदस्यांना कोयता आणि पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि चार लाखाची रोकड असा 28 लाखाचा ऐवज चोरला होता.
याप्रकरणी ओळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तांत्रीक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या दरोडेखोरांवर दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी असे एकुण 20 गुन्हे आहेत. याच टोळीने दिंडोरी येथे एका कंपनीत दरोडा टाकल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
प्रवासादरम्यान दरोड्याचे नियोजन –
या प्रकरणातील आरोपी नईम चांद शेख हा शिवनेरी बसवर कंत्राटी चालक आहे. तो पुणे- नाशिक बस चालवतो. या बसने नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बोलण्यातून त्याला सदाशिव बोरचटे यांच्या संपत्तीचा अंदाज आला होता. यानंतर त्याने मुलाला आणि इतर मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगारांना हाताशी धरुन कट रचला.