पुणे – कौटुंबिक वादातून पित्याने पोटच्या तेरा वर्षाच्या मुलीला मध्यरात्री कॅनोलमध्ये बुडवून जीवे मारले. कॅनोलमध्ये टाकल्यावर मुलीने मदतीसाठी आरडा ओरडा केला. मुलगी जीवंत असल्याचे लक्षात आल्यावर पित्याने कॅनोलमध्ये उडी मारुन तीला पाण्यात बुडवून मारले. यानंतर पित्याने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सारसबाग चौकातील सावरकर पुतळ्या मागील कॅनोलमध्ये घडली.
दरम्यान शुक्रवारी दुपारी मुलीचा मृतदेह पोलिसांना बुडवलेल्या ठिकाणीच मिळून आला तनुश्री संदीप शिंदे (13) असे मृत मुलीचे नाव आहे. तर संदीप विष्णू शिंदे (40,रा. धनकवडी) असे खून करणाऱ्या पित्याचे नाव आहे. याप्रकरणी, तनुश्रीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप शिंदे याच्या विरुद्ध स्वारगेट पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले की, संदीप शिंदे हा रिक्षाचालक आहे. कौटुंबिक कारणातून त्याचा पत्नीसोबत वाद होता. मागील पाच वर्षापासून दोघे वेगळे राहत होते. तनुश्री काही दिवस आईकडे तर काही दिवस वडिलांकडे राहत होती. काही दिवसापुर्वी ती वडीलांकडे धनकवडी येथे राहण्यास आली होती. त्याने पत्नीच्या मोबाईलवर फोन करून मी तनुश्रीला जीवंत ठेवणार नाही असे सांगितले होते.त्यामुळे तनुश्रीच्या आईने धनकवडी येथील घर गाठले. मात्र पती आणि मुलगी घरी मिळून आली नाही. यामुळे तीने सहकानगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.