पुणे – पगारावरुन होत असलेल्या वादातून कंपनी मालकासह इतरांनी संगमत करून कामागराला बेदम मारहाण करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी (अजित पवार गट) शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यासह तेरा जणांवर चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेखर महादेव जोगळेकर (वय – ५८), प्रणव शेखर जोगळेकर (वय २२), दयानंतर सिद्राम इरकल (रा. पांडवनगर), बाळु पांडुरंग मिसाळ (वय ५४, रा. कर्वेनगर), प्रमोद श्रीरंग शिंदे (वय २९, रा. शिवणे), रुपेश रविंद्र कदम (वय ३७, रा. वडारवाडी), संतोष उर्फ बंटी दत्तात्रय हरपुडे (वय ३८) आणि अन्य अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत रेश्मा अविनाश भिडे (वय ३०, रा. धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. तर, अविनाश आनंद भिडे (वय ३६, रा. धायरी) असे मयताचे नाव आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये अविनाश भिडे यांचे निधन झाले होते. त्याबाबत चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांचे पती अविनाश भिडे हे शेखर जोगळेकर यांच्या कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होते. या दोघांमध्ये पगारावरुन वाद होत होते. पूर्वीही शेखर जोगळेकर आणि प्रणव जोगळेकर यांनी अविनाश यांना शिवीगाळ करुन माराहण करुन ऑफिस मधून हाकलून दिले होते.