पुणे – शहरातील मध्यवर्ती बिबवेवाडीतील सुखसागरनगरमध्ये चोरट्यांनी इमारतीतील एका बंद घराचे कुलूप तोडून रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून ३ लाख ५० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना काल मध्यरात्री तीनच्या सुमारास दिगंबर प्रसाद हौसिंग सोसायटीत घडली. याप्रकरणी सचिन कसबे (वय ३३) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी सचिन कुटूंबियासह दिगंबर हौसिंग सोसायटीत राहायला आहेत. कामानिमित्त ते बाहेरगावी गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडले. त्यानंतर घरातील १० हजारांची रोकड अणि दागिने असा ३ लाख ५० हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक किरण देशमुख तपास करीत आहेत.