पुणे – शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील महिला शिपायाला त्रास देऊन मारहाण केल्याच्या आरोपावरून सहायक फौजदारासह चार पोलिसांवर कोर्टाच्या आदेशानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ३५ वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहायक फौजदार रत्नकांत इंगळे, रसिका चव्हाण, कुसुम मोरे आणि अश्विनी कुदळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या शिवाजीनगर पोलिस लाईनमध्ये राहण्यास आहेत. त्यांना घरातून हालकून लावण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्यांच्या विरोधात खोटा अर्ज केला. त्यानंतर आरोपी इंगळे यांनी फिर्यादी यांना फोन करून तुझा अर्ज आला आहे, असे म्हणत अश्लिल बोलून विनयभंग केला. तसेच, त्यानंतर इतर महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना त्रास दिला. तसेच, त्यांनी केलेली तक्रार मागे घेण्यासाठी घरात घुसून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच, आरोपी इंगळे सोबत बोलणे झालेली फिर्यादी यांनी तयार केलेली सीडी आरोपींनी फोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी महिला पोलिस शिपाई यांची पोलिस ठाण्यात तक्रार घेतली नाही. त्यामुळे त्यांनी कोर्टात खासगी फौजदारी दावा दाखल केला होता. या मध्ये सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार चौघांच्या विरोधात विनयभंग, मारहाण करणे, धमकाविणे अशा विविध कमलानुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.