हडपसर – करोना महामारीच्या काळात सर्वत्र भीतीदायक व नकारात्मक वातावरण होते. सर्वजण वेगवेगळ्या तणावाखाली होते. मात्र, याला आमचा प्रभाग अपवाद ठरला. कारण, नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी आमची काळजी घेतली. नानांनी जे काही काम केले ते “दिल से’ केले, अशी भावना “न्याती काउंटी रेसिडंट्स फोरम’च्या सभासदांनी व्यक्त केली.
महंमदवाडी येथील जय भवानी चौक ते न्यातीच्या संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण व सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी सभासदांनी आपल्य भावना व्यक्त केल्या. यावेळी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, पुनीता रंजन, दिपा चिमा, दिपा बीड, शुब्रा सिंग, पलक मेहता, ईशानी चौपेला, सकिना पुनावाला, अवंतिका वैलुर,सौम्या माथूर, एलेना मार्शल, अभिमन्यू भानगिरे, हर्षद दातार, राम सिंग, संदीप कोलाटकर, सतीश राजीवडे, सचिन तरवडे, प्रवीण खरात, न्याती काउंटी रेसिडन्स फोरमचे सर्व सभासद उपस्थित होते.
नगरसेवक नाना भानगिरे यांना आजवर आम्ही जी काही कामे सांगितली ती त्यांनी तत्काळ पूर्ण केली. चौकाचे सुशोभीकरण केले, सीसीटीव्ही कॅमेरे बसविले, संरक्षक भिंतीवर वॉल आर्ट केले. यामुळे परिसर सुंदर आणि स्वच्छ झाला आहे. हे केवळ “नाना’च करू शकतात, अशा शब्दांत न्याती काउंटी, न्याती इस्टेट व एनकेल्व्ह तसेच न्याती काउंटी रेसिडंट्स फोरमच्या सभासदांनी कौतुक केले.
प्रभाग क्र. 44 व 46 हे दोन्हीही प्रभाग स्वच्छ व सुंदर असावेत, असा माझा मानस आहे. त्यानुसार टप्याटप्याने सुशोभीकरण करून आवश्यक त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच, सोसायटीच्या संरक्षक भिंतीवर वॉल आर्टही करण्यात आले आहे. यामुळे यातून स्वच्छ व सुंदर पुणे असा संदेश जाणार आहे.
– प्रमोदनाना भानगिरे, नगरसेवक