पुणे : ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णाने निवासी डॉक्टर महिलेला धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात रुग्णाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉक्टर महिलेने याबाबत फिर्याद दिली. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला रूग्ण दुर्धरविकाराने ग्रस्त आहे. ससून रूग्णालयात तो सध्या उपचार घेत आहे. दोन दिवसांपूर्वी सकाळी अकराच्या सुमारास रूग्णाने उपचारासाठी लावलेला कॅथेटर स्वत: काढला आणि तो फेकून देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रूग्णालयात असलेल्या डॉक्टर महिलेने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. रुग्णाने डॉक्टर महिलेला धक्काबुक्की केली. त्यावेळी तेथे असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रूग्णाने सफाई कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली.