पुणे – ससून रुग्णालयातील अधीक्षक कार्यालयात झालेल्या लाचलुचपत कारवाईनंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लापा जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील भामरे यांची नवीन अधीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी हे आदेश दिले.
शासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रतिपूर्तीची बिले प्रमाणित करण्यासाठी ससून रुग्णालयामध्ये येतात. मात्र, त्या बिलांच्या फायलींवर वजन ठेवल्याशिवाय कुठलेही बिल पास होत नाही. तसेच त्यामध्ये त्रुटी नसतानाही मुद्दामून त्रुटी काढल्या जातात, हे पुन्हा एकदा या कारवाईमधून समोर आले आहे.
अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक गणेश गायकवाड याला तक्रारदाराकडून बिल मंजुरीसाठी अडीच हजाराची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई अधीक्षक कार्यालयात झाली असून, या कार्यालयाचे विभाग प्रमुख म्हणून डॉ. जाधव यांची बदली केली.