पुणे – फर्गसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेल्हे तालुक्यातील गुंजवणे आणि साखर या गावातील ग्रामस्थांच्या सहायाने जैवविविधता नोंदी केल्या. डीईएस पुणे विद्यापीठ, सृष्टी कंजर्वेशन फाऊंडेशन आणि रेनट्री यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी सहा दिवसांचे वर्ग आणि नऊ दिवसांच्या प्रात्यक्षिकांसह कार्यशाळेत सहभाग घेतला. गावांतील जैवविविधता आणि पारंपरिक ज्ञानाच्या विविध पैलूंचे दस्तऐवजीकरण करण्यात आले.
या अंतर्गत कृषी जैवविविधता, वन्यजीव जैवविविधता, लोकदृश्ये आणि जैवविविधतेसंबंधित पारंपरिक आणि सांस्कृतिक ज्ञान यांचा समावेश होता. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्याची, स्थानिक नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि व्यवस्थापन आणि जैवविविधतेवर लोकांची निर्भरता समजून घेण्याची संधी मिळाली.
प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, रेनट्रीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नमिता दांडेकर, सृष्टी फाऊंडेशनचे डॉ. गिरीश जठार, डॉ. राहुल मुंगीकर यांनी मार्गदर्शन केले. प्राध्यापिका पूनम देशपांडे, डॉ. रुपाली गायकवाड आणि केतकी वैद्य यांनी संयोजन केले.