नगर – रस्त्याचे काम का बंद केले, तुम्हाला कोणी विरोध करत आहे का ? अशी विचारणा शाखा अभियंत्यास केली असता माजी नगरसेवकासह घरातील सदस्यांनी आइ व मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना केडगाव उपनगरातील भूषणनगर परिसरात शुक्रवारी सकाळी घडली. या मारहाणीत मायलेक जखमी झाले असून, माजी नगरसेवकासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
राजेंद्र सातपुते हे शुक्रवारी सकाळी भूषणनगर येथील राधेश्याम चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यास तुम्ही रस्त्याचे कामे बंद का केले, ही जागा आमची आहे, आमची काम करण्यास काहीही हरकत नाही. तुम्हाला कोणी विरोध करत आहे का, अशी विचारणा केली.
त्यावेळी तेथे विजय मोहन पठारे, राजेंद्र मोहन पठारे व पूजा विजय पठारे आले. त्यांनी राजेंद्र सातपुते यांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण सुरू केली. तेव्हा गुंफाबाइ सातपुते या भांडण सोडवायला आल्या असता त्यांनाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत राजेंद्र भाऊसाहेब सातपुते व त्यांची आइ गुंफाबाइ सातपुते हे दोघे जखमी झाले. याफिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.