पुणे – तब्बल 23 वर्षांनी होणाऱ्या पुणे बाजार समितीच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षांच्या अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलने 15 पैकी 10 उमेदवार जाहीर केले आहेत. शुक्रवारी (दि.14) जाहीर करण्यात आलेल्या या यादीमध्ये नऊ उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. तर ठाकरे गट शिवसेनेला एक जागा देण्यात आलेली आहे. निवडणूकीसाठी 28 एप्रिलला मतदान होणार असून, 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. जाहीर झालेल्या नावांमध्ये पुणे बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश म्हस्के यांचे बंधू शेखर आणि माजी संचालक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या पत्नी सरला यांचा समावेश आहे.
मोठ्या कालावधीनंतर निवडणूक लागल्याने अनेक जण इच्छुक आहेत. अद्याप 5 उमेदारवार ठरलेले नाहीत. विकास सोसायटीच्या 11 पैकी 7 जागांचे उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत. सर्वसाधारण गट शेखर सहदेव म्हस्के (कळस), संतोष आबासाहेब कांचन (उरळी कांचन), अशोक सुदाम गायकवाड (कोलवडी), योगेश बाळासाहेब शितोळे (न्हावी सांडस) यांचा समावेश आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून सचिन बाळासाहेब घुले (उंड्री), महिला प्रवर्गातून सरला बाबुराव चांदेरे (बाणेर), विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातून अर्जून पिलाजी मदने (कोलवडी) यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.
ग्रामपंचायत मतदार संघात चारपैकी तीन जागांवर उमेदवारी जाहीर झाली आहे. सर्वसाधारण गटातून महाराष्ट्र केसरी राहुल रामचंद्र काळभोर (लोणी काळभोर), ठाकरे गट शिवसेनेतून रामकृष्ण हेमचंद्र सातव (वाघोली) आणि आर्थिक दुर्बल प्रवर्गातून नवनाथ रोहिदास पारगे (डोणजे) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बाजार समिती राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचा पॅनेलचे 10 उमेदवार जाहीर केले आहेत. उद्या (शनिवार दि. 15) पाच उमेदवार जाहीर केले जातील. माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुचनेनुसार या उमेदवारी देण्यात आलेल्या आहेत.
– प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस