जास्त उत्पादन करण्यात लोहारे याचा हातखंडा
दिवसाला एमडीचे 20 किलो उत्पादन घ्यायचा
मार्केटच्या हव्यासापोटी आलेला ललित पुण्यात फसला
पुणे – अंमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला मंगळवारी मुंबई पोलिसांच्या ताब्यातून वर्ग करून घेण्यात आले. त्याच्याकडे दोन दिवसांत पोलिसांनी केलेल्या चौकशीत ड्रग निर्मिती आणि विक्रीची धक्कादायक माहिती पुढे आली. राज्यामध्ये राजरोसपणे ठिकठिकाणी एमडी ड्रगची निर्मिती होत असली तरी ती दिवसाला दोन ते पाच किलो दरम्यानच होते. यामध्ये एक्सपर्टची खूपच वानवा असल्याने मोठ्या प्रमाणात निर्मिती करणारे छुपे कारखाने नाहीत. मात्र, राज्यात 2019 नंतर ललित पाटीलचा गुरु अरविंद लोहारे याने एमडी उत्पादनात आघाडी घेतली.
तो राज्यातला एकमेव मोठा एक्सपर्ट होता. तो दिवसाला 20 किलोचे उत्पादन घेत होता. विशेष म्हणजे या सर्व ड्रग्सची विक्री फक्त मायानगरी मुंबईतच व्हायची. बॉलीवुड, पंचतारांकित पार्ट्या आणि पबमुळे तेथे माल हातोहात खपायचा. पाटील आणि कंपनीला हे एकमेव मार्केट पुरेसे होते. मात्र, जास्त हव्यासापायी त्याने पुणे शहरात एमडीची विक्री करण्याचा प्रयत्न केला आणि तेथेच तो फसला.
ललित पाटीलविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात ड्रग विक्री आणि पलायनप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे आहेत.
ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. तसेच त्याचे साथीदार शिवाजी शिंदे आणि राहुल पंडित यांनाही पकडले. या प्रकरणात आजवर ललितची एक वकील मैत्रीण आणि दुसरी एक मैत्रिण अशी दोघींना अटक केली. तसेच अरविंद लोहारे, रेहान उर्फ गोलू अन्सारी, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, विनय अऱ्हाना हेही अटकेत आहेत.
ललित पाटीलची लोहारेबरोबर येरवडा कारागृहात ओळख झाली. त्याने ललित पाटीलमार्फत भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना एमडी तयार करण्याचा फॉम्युला दिला. महाड, रांजणगाव आणि नाशिकला याचे उत्पादन घेतले जायचे. लोहारेचे शिक्षण एमएसस्सी (केमिकल) असे आहे. यामुळे साहजिकच बॉलिवुडपर्यंत त्याचे धागेदोरे जातात. मात्र, बॉलिवुडचा संबंध ग्राहक म्हणून येऊ शकतो. मात्र, आमचा तपास उत्पादक, विक्रेता आणि पेडलर (किरकोळ विक्रेता) यांच्यापर्यंतच असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
65 लाखांचा हिशोब आणि सोन्याच्या विटा
ललित पाटील पळून गेल्यावर त्याच्यासाठी अभिषेक पाटीलने 65 लाख एका सोनाराकडे ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे. या 65 लाखांतील 30 लाख रुपयांचा हिशोब पोलिसांना मिळाला. हे तीस लाख रुपये ललित पाटीलने पलायन करताना वेगवेगळ्या कामासाठी वापरल्याचे सांगितले. तर 35 लाख रुपये मैत्रिणीकडे दिल्याचे सांगितले. मात्र, मैत्रिणीने अद्यापही ते घेतल्याचे कबूल केले नाही. तसेच तिच्या घरझडतीमध्येही ते सापडले नाहीत. या 35 लाख रुपयांचा शोध सुरू आहे. तर पाटीलने ड्रगच्या माध्यमातून कमावलेल्या पैशातून 8 किलो सोन्याच्या वीटा खरेदी केल्याची कबुली दिली. यातील तीन वीटा सापडल्या. अजून पाच विटा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिक तपासासाठी पुणे पोलिसांचे एक पथक ललितला घेऊन नाशिकला गेले आहे.