भूमि अभिलेख विभागाकडून तयारी
पहिल्या टप्प्यांत 356 गावांत प्रयोग
पुणे – पालिकेच्या प्रॉपर्टी टॅंक्सच्या धर्तीवरच आता जमीनविषयक महसूल कर अर्थात शेतसारादेखील ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी भूमि अभिलेख विभागाने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 356 गावांमध्ये या प्रणालीचा वापर करण्यात आला. या गावांमध्ये प्रामुख्याने शेतीचा कर असल्याने आता दुसऱ्या टप्प्यात ज्या गावांमध्ये नागरीकरण झाले असून शेती तसेच अकृषिक (एनए) जमिनी आहेत. त्या गावांमध्ये या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरालगतची प्रत्येक जिल्ह्यातील पाच गावे निवडण्यात आली असून याठिकाणी ऑनलाइन नोटीस बजावून ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या सुविधेमुळे शेती कर, बिनशेती कर, शिक्षण उपकर, रोजगार हमी उपकर, ग्रामपंचायत उपकर, जिल्हा परिषद उपकर आदी प्रकारचे कर घरबसल्या भरता येणार आहे. शेतसारा हा पारंपारिक कर आहे. इंग्रजांच्या काळापासून जमिनींवर कर लावण्यास सुरुवात झाली. पूर्वी शेतसारा हा महसुल देणारा महत्त्वाचा कर होता. कालानंतर जशी प्रगती होत गेली. तसे नव-नवे कराची आकारणी सुरू झाली. मात्र जमिनींवर आकारला जाणारा या कराची वसुली आजही सुरू आहे.
जमिनीच्या क्षेत्रानुसार या कराची अंमलबजावणी होते. शेतीचा कर हा अल्प असल्याने या कराची वसुली अपेक्षित प्रमाणे होत नाही. थकबाकीची रक्कम मोठी झाल्यावर हा कर मोठा वाढतो. थकबाकीची रक्कम ही तलाठी कार्यालयात गेल्यावरच कळते. तसेच आता घरबसल्या ऑनलाइन सात-बारा उतारा असल्याने तलाठी कार्यालयात सुद्धा नागरिकांना जावे लागत नाही. त्यामुळे हा कर वसूल होत नाही.
यासाठी आता भूमि अभिलेख विभागाने ई-चावडी या संगणक प्रणालीमध्येच शेतीचा कर ऑनलाइन भरण्याची सुविधा देण्यासाठी काम सुरू केले आहे. त्यासाठी संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात किंवा महसूल विभागात रजिस्टर नमुना लिहण्याची पद्धत वेगळी आहे. देथील अडचणी सोडवून संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील गावांचा समावेश
जमाबंदी आयुक्त कार्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार शेतसारा ऑनलाइन प्रणालीसाठी शहरालगतची पाच गावे निवडण्यात आली आहे. प्रत्येक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील एका गावाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये हवेली मधील होळकरवाडी, खेड मधील पाचारणेवाडी, मावळमधील सोमाटणे, इंदापूरमधील मदनवाडी आणि पुरंदरमधील दिवे गावाची निवड करण्यात आली आहे