नवी दिल्ली – सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया आणि इन्फोसिस कंपनी यांनी संयुक्तपणे देशातील 10 ते 22 वयोगटातील सहा कोटी युवकांना डिजीटल कौशल्याचे प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे.
ही योजना प्रामुख्याने ग्रामीण भागातील युवकांसाठी राबवली जाणार आहे. सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश त्यागी यांनी जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रधानमंत्री ग्रामीण डिजीटल साक्षरता अभियाना अंतर्गत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
युवकांमधील डिजीटल साक्षरता वाढावी तसेच त्यांना रोजगार सक्षम करावे या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे. देशातील युवकांसाठी आता डिजीटल इंडिया हेच भवितव्य आहे. त्यामुळे त्यांना या नव्या युगात समर्थपणे प्रवेश करता यावा आणि त्यांच्यात कौशल्याद्वारे आत्मविश्वास विकसित व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे.