पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेते व कार्यकर्त्यांकडून जुन्नर तहसील कार्यालय येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरवात झाली. यावेळी आंदोलकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शरद पवार झिंदाबाद अशी घोषणाबाजी केली.
तहसील कार्यालय समोर आमदार अतुल बेनके व प्रमुख नेते मंडळी यांनी पवार यांच्या घरावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. त्यानंतर तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन देण्यात आले.
अतुल बेनके यांनी म्हटलं की, शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध नोंदवत आहोत. या घटनेत पोलीस प्रशासन कमी पडल्याचं त्यांनी म्हटलं. आमच्या आंदोलनाला काँग्रेस आणि शिवसेना देखील आमच्या सोबत असल्याचं बेनके यांनी नमूद केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार,बाजार समितीचे चेअरमन संजय काळे,जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, देवराम लांडे,प्र वक्ते भाऊ देवाडे, जिल्हा दूध संघ संचालक बाळासाहेब खिलारी, तानाजी बेनके, शेतकरी संघटनेचे लक्ष्मण शिंदे, पिंपरी चिंचवड निरीक्षका उज्वला शेवाळे, शहराध्यक्ष धनराज खोत, युवती अध्यक्षा मांडे,युवक अध्यक्ष सूरज वाजगे, बाळासाहेब सदाकाळ, अंबर परदेशी, समदभाई इनामदार, फेरोज पठाण उपस्थित होते.