हडपसर(प्रतिनिधी) : हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे लहान- मोठे अपघात घडत आहेत. महापालिका प्रशासनाला वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून रस्ते चांगले करावेत, या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज राष्ट्रीय पाटील तालीम संघाचे उल्हास तुपे यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या गेटवर चारचाकी वाहन आडवे लावून आंदोलन केले.
तासभर वाहन आडवे लावून रस्ता रोखून धरला होता. दरम्यान क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकारी यांनी संध्याकाळ पर्यंत काही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिल्यानंतर वाहन बाजूला करण्यात आले.
हडपसर परिसरात ठिकठिकाणी रस्त्यावर गेली काही दिवसांपासून खड्डे पडले असून यातून वाट काढताना नागरिकांना कमालीची कसरत करावी लागत आहे. यात अनेकांना लहान- मोठे अपघात घडले आहेत. त्यामुळे हा त्रास कमी व्हावा ,रस्ते त्वरीत दुरुस्त करण्यात यावे यासाठी हे आंदोलन उस्फुर्तपणे करण्यात आल्याचे राष्ट्रीय पाटील तालीम संघाचे उल्हास तुपे यांनी सांगितले.