पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यसभा सदस्य म्हणून खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी बुधवारी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांना शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व भाजप नेत्यांविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी प्रा. डाॅ. कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, संघ पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेही त्यांनी आभार मानले.
“ही शपथ घेताना अनेक दिग्गजांच्या आवाजाचे ध्वनि माझ्या कानात घुमत होते. ज्यांनी कर्तृत्त्वाने, प्रतिभेने आणि वक्तृत्त्वाने या सभागृहावर आपली छाप पाडली. माझ्यामधील क्षमतांचा पूर्णपणे वापर करून आपल्या देशाच्या या अत्युच्च सभागृहात उत्तम कामगिरी करून मातृभूमीच्या वैभवशाली परंपरेत, लौकिकात भर टाकण्याचा प्रयत्न करेन असे वचन मी देते,’ अशी प्रतिक्रिया खासदार कुलकर्णी यांनी दिली.