- वैद्यकीय विभागाच्या निर्णयाने आश्चर्य; पालिकेची भूमिका संशयास्पद
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्ण दगावल्यास त्याचे ऑडिट करण्यासाठी समिती स्थापन करावी, अशी सूचना जाणकार तांत्रिक समितीच्या सल्लागारांनी दिली होती. त्यानंतरही गेले अनेक दिवस त्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर यावर लक्ष देत महापालिकेने खासगी व महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांची पडताळणी करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली. मात्र यामध्ये वैद्यकीय विभागाने सोयीस्कररित्या खासगी रुग्णालयांना सूट दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हिवाळ्यातील थंड वातावरण तसेच, दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा व इतर ठिकाणच्या वाढत्या गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वाढीचा अंदाज राज्य शासनाच्या करोना तांत्रिक समितीचे सल्लागार डॉ. सुरेश साळुंखे व पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 3 नोव्हेंबरला व्यक्त केला होता. गेल्या आठवड्याभरापासून शहरात रूग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यामध्ये मृत्यूचे ऑडिट करण्यासाठी कमिटी स्थापन केली. मात्र यामध्येही महापालिका प्रशासनाचा झोल समोर आला आहे. ऑडिट कमिटी स्थापन करण्याचे सोपस्कर प्रशासनाने केले असले तरी या कमिटीला केवळ पालिकेच्या व शासकीय रुग्णालयातील मृत्यूचे ऑडिट करता येणार असून खासगी रुग्णालयांना मात्र यामधून सवलत देण्यात आली आहे.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये करोनामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाण सुरूवातीपासून कमी आहे. सर्वात कमी मृत्यूदर असणारी ही राज्यातील एकमेव महापालिका असल्याचा दावा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वारंवार केला आहे. खासगी रुग्णालयात मृत्यू जास्त होत असल्याने डेथ ऑडिट कमिटी स्थापन केली जावी असे निर्देश होते. करोनामुळे झालेले मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला यावर संशोधन करण्याचे काम ही कमिटी करणार आहे. ज्या रुग्णांचा मृत्यू त्यांना दाखल केल्यापासून 48 तास, 5 दिवस तसेच आठवड्याच्या आत खासगी रुग्णालयात झाला. तर त्या रुग्णांची उपचाराची सर्व कागदपत्रे कमिटीकडून मागविली जातात. त्यामध्ये त्या रुग्णांचे वय, कोमॉर्बिटीटी, वैद्यकीय स्थिती याबाबत सखोल अभ्यास करून मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याची पडताळणी करण्यात येते.
मात्र या स्थापन केलेल्या कमिटीला केवळ पालिकेचे वायसीएम रुग्णालय, ऑटो क्लस्टर कोविड सेंटर आणि शासनाचे जम्बो कोविड रुग्णालय येथे झालेल्या मृत्यूचे ऑडिट करण्याचे अधिकार दिले आहेत. कमिटीसाठी आयुक्तांनी आदेशात घालून दिलेल्या कार्यकक्षेत कुठेही खासगी रुग्णालयातील मृत्यूचे ऑडिट करण्याचा उल्लेख केलेला नाही. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये होत असलेल्या मृत्यूचे डेथ ऑडिट होणे अपेक्षित असताना वैद्यकीय विभागाने सोयिस्कररित्या खासगी रुग्णालयांना यामधून सूट दिली आहे.
त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयांमधील मृत्यूच्या चौकशीसाठी एवढी तत्परता दाखविली असताना खासगी रुग्णालयावर महापालिका प्रशासन एवढे मेहेरबान कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
2285 जणांचा मृत्यू
पिंपरी चिंचवड शहरामध्ये आतापर्यंत 2285 जणांचा मृत्यू झाला आहे. मार्च महिन्यामध्ये करोनाचे पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मात्र मे महिन्यापासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली. तसेच रुग्णांचे मृत्यूही होऊ लागले. गेल्या सात महिन्यामध्ये शहरातील 1618 तर शहराबाहेरील 667 अशा 2285 रुग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाला. तर 91 हजार 750 जणांना करोनाची लागण झाली आहे.