मोरबी – मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटना स्थळाची पाहणी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी आज केली व नंतर या घटनेत जखमी झालेल्यांचीही इस्पितळात जाउन विचारपूस केली. मात्र पंतप्रधान येणार असल्याच्या काही तास अगोदरच अत्यंत गतिमान पध्दतीने येथे रंगरंगोटी आणि साफसफाईचे काम करण्यात आले. कोणाच्या सांगण्यावरून हे केले आणि त्यामागे काय उद्देश होता या प्रश्नांची उत्तरे मिळतील तेव्हा मिळतील. मात्र विरोधकांनी पुन्हा एकदा मोदींवरच त्यावरून निशाणा साधला आहे.
एका इंग्रजी वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार मोरबीच्या त्या सरकारी रूग्णालयात मोदींच्या भेटीच्या अगोदर काही निवडक रूग्णांची निवड करण्यात आली. ज्या खोल्यांना नव्याने रंग देण्यात आला आहे त्या खोल्या आणखी स्वच्छ करून या रूग्णांना तेथे हलवण्यात आले. तसेच तेथे पिण्याचे स्वच्छ पाणीही ठेवण्यात आले. रूग्णालयाची दयनीय अवस्था पंतप्रधानांच्या निदर्शनास येऊ नये यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आला. काही तासांतच संपूर्ण रूग्णालय चमकावण्यात आले.
संबंधित माध्यमाच्या बातमीनुसार रूग्णालयाच्या तळमजल्यावर एक कक्ष आहे. तोही स्वच्छ करण्यात आला. नवे बेड, नव्या चादरी अशी सगळी व्यवस्था तेथे केली गेली. पहिल्या मजल्यावर उपचार घेत असलेल्या काही मोजक्या रूग्णांना येथे आणण्यात आले. ज्या नव्या चादरी वापरण्यात आल्या त्यावर जामनगरच्या रूग्णालयाचा शिक्का होता. जामनगर मोरबीपासून 160 किमी अंतरावर आहे. आपले पितळ उघडे पडू नये यासाठीच विद्युतगतीने ही सगळी कामे रूग्णालयाच्या प्रशासनाकडून करण्यात आल्याचा दावा या बातमीत करण्यात आला आहे.
चाळीस पेंटर कामाला –
पंतप्रधान येणार म्हणून तब्बल 40 पेंटर बोलावून त्यांना कामाला लावण्यात आले. रात्रभरात त्यांनी रूग्णालयाचे बाह्यरूप पालटून टाकले. तसेच ज्या वॉर्डांमधील रूग्णांना मोदी भेटणार होते ते वॉर्डही आतून चमकावण्यात आले. एका रात्रीतून रूग्णालयातील शौचालयांमधील टासल्स बदलण्यात आल्या आणि नवे वॉटर कुलरही बसवले गेले. अगोदर रूग्णालयातील नळ गंजलेले दिसत होते ते आता नवे आणि चकचकीत दिसू लागले होते.