नवी दिल्ली- विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. मात्र, 2018 मध्येही विरोधकांनी तेंव्हाच्या म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असाच प्रयत्न केला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जे उत्तर दिले होते ते आता व्हायरल झाले आहे. तेंव्हा विरोधकांच्या प्रस्तावाचा उपहास करताना त्यांनी 2023 मध्येही असाच प्रस्ताव आणण्याची आतापासून तयारी करावी, असे वक्तव्य मोदी यांनी केले होते.
2018 मध्ये अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना मोदी म्हणाले होते की, माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. विरोधकांनी आतापासूनच एवढी तयारी करावी की त्यांना पाच वर्षांनी म्हणजे 2023 मध्ये पुन्हा एकदा प्रस्ताव आणण्याची संधी मिळेल. विरोधी पक्षाच्या एका सदस्याला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले होते की, कॉंग्रेस पक्षाच्या एकेकाळी 400 पेक्षा अधिक जागा लोकसभेत असायच्या. त्यांच्या अहंकाराचाच हा परिपाक आहे की आज ती संख्या घटून 40 पर्यंत खाली आहे. तर भाजप याउलट आपल्या सेवावृत्तीमुळे 2 जागांवरून आज स्वबळावर सत्तेवर आली आहे.