नवी दिल्ली – सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी विविध केंद्रीय आणि राज्य दलातील 954 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवा पदके जाहीर केली आहेत. त्यात 230 जवानांना राष्ट्रपतींच्या शौर्य पदकांनी सन्मानित केले जाईल.
सीआरपीएफ अधिकारी लुक्रकपम इबोमचा सिंग यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे. सेवेतील हे त्यांचे दुसरे शौर्य पदक आहे. इतर पदकांमध्ये विशिष्ट सेवेसाठी 82 राष्ट्रपती पोलीस पदके आणि गुणवंत सेवेसाठी 642 पोलीस पदक विजेत्यांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत.
ज्यांना ही पदके जाहीर झाली आहेत जम्मू आणि काश्मीर पोलिसांसाठी 55, महाराष्ट्र पोलीस दलातील 33, केंद्रीय राखीव पोलीस दलातील 27 आणि छत्तीसगड पोलीस दलातील 24 जणांचा समावेश आहे. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन अशा दोन वेळा वर्षातून दोनदा ही पारितोषिके जाहीर केली जातात.
महाराष्ट्रात पोलीस पदक मिळालेल्याची नावे
पोलीस शौर्य पदकांमध्ये महाराष्ट्रातल्या चंद्रकांत उके, महारु कुळमेथे, पोडा अत्राम, दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, देविदास हलामी, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडप, किरण हिचामी, वारलू अत्राम, माधव तिम्मा, नरेश सिदाम, रोहिदास कुसनाके, मुकिंद राठोड, नितेश दाणे, रोहित फार्णे, बाळासाहेब जाधव, सतीश पाटील, भास्कर कांबळे, कृष्णा काटे, द्रुग्साय आसाराम नरोटे,नागेश पाल, कैलाश कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार,सुरपत वड्डे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुरम, मसरू कोरेटी, मुकेश उसेंडी, विनोद डोकरमारे, कमलाकर घोडाम यांचा समावेश आहे.
राज्यातल्या 33 पोलिसांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे. याशिवाय राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि अमरावती, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.