बिजिंग: चीनमधील वुहान येथून करोना विषाणूचा प्रसार झाल्याचा दावा अमेरिकासह अनेक देशांकडून करण्यात येत आहे. परंतु चीनने हा दावा सातत्याने फेटाळला आहे. परंतु आता एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. चीन आता पाकिस्तानला जैविक युद्धाचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी दोन्ही देशांमध्ये एक गुप्त करार करण्यात आला आहे.
याद्वारे चीन पाकिस्तामध्ये धोकादायक जीवाणू, विषाणू आणि इतर जीवाणूंच्या संशोधनात मदत करत असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि चीनने जैविक शस्त्रास्त्रांची क्षमता वाढवण्यासाठी तीन वर्षांसाठी एक गुप्त करार केला आहे. वुहान लॅबने संसर्गजन्य रोग आणि संसर्गजन्य रोगांवर जैविक नियंत्रणावरील संशोधनासाठी पाकिस्तानच्या सैन्याच्या सायंस अँड टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशनसोबत करार केला असल्याचे या अहवालात अँथनी क्लॅन यांनी नमूद केले आहे.
चीन आंतरराष्ट्रीय समुदायाच्या निशाण्यावर येण्यापासून वाचावा यासाठी देशाच्या सीमेबाहेर असे प्रोजेक्ट करण्याचा चीनचा मानस असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. तसेच वुहान लॅबने आर्थिक आणि शास्त्रीय अहवाल आणि साहित्यदेखील दिले आहे. यासाठी चीन संपूर्णत: आर्थिक मदत करत आहे. तसेच या गुप्त प्रोजेक्टमध्ये कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय काम करता यावे यासाठी तो विद्यापीठ आणि
सरकारी आरोग्य विभागातूनही हटवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरोधात उभे करावे यासाठी चीन या प्रोजेक्टशी जोडला गेला असल्याचे भारतीय आणि पश्चिमी गुप्तचर यंत्रणांचे मत असल्याचा दावा काही तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. बायो केमिकल संशोधनासाठी पाकिस्तानचा केंद्र म्हणून वापर करावा आणि इतरांच्या निशाण्यावर येण्यापासून वाचावे, अशी चीनची इच्छा असल्याचेही सांगण्यात येत आहे.