मुंबई – भारतीय महिला क्रिकेट संघाची क्रिकेटपटू पूनम राऊतने आयसीसीच्या फलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीत टॉप 20 मध्ये स्थान मिळवले आहे. पूनमने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत तीन सामन्यात 62, 77 व नाबाद 104 धावा केल्या.
या कामगिरीमुळे पूनमने आठ स्थानांची झेप घेत 18 वे स्थान पटकावले आहे. स्मृती मानधना 7 व्या तर, कर्णधार मिताली राज 9 व्या स्थानी आहे. उपकर्णधार हरमनप्रीत कौर 15 व्या स्थानावर आहे. तर, गोलंदाजांच्या यादीत तिला 49 वे स्थान मिळाले आहे.
डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडने गोलंदाजांच्या यादीत 18 वे तर, वेगवान गोलंदाज मानसी जोशीने 64 वे स्थान मिळवले आहे. दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लिजेल ली हिने सात स्थानांची झेप घेत अव्वल स्थान मिळवले आहे. महिला एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवणारी ती दक्षिण आफ्रिकेची पहिली खेळाडू आहे.