लखनौ – कर्णधार मिताली राजचे अफलातून अर्धशतक व राजेश्वरी गायकवाडने केलेल्या भेदक गोलंदाजीनंतरही भारतीय महिला संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या विजयाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने पाच सामन्यांची ही मालिका 4-1 अशी जिंकली.
प्रमुख फलंदाज बाद होत असताना मितालीने मात्र, आपली गुणवत्ता सिद्ध करताना 79 धावांची खेळी केली. तिच्या खेळीमुळेच संघाला 9 बाद 188 अशी समाधानकारक धावसंख्या उभारता आली. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अत्यंत जबाबदारीने खेळ केला.
4 बाद 27 अशा बिकट स्थितीतून ऍनी बोश व मिगनन डी प्रेज यांनी अर्धशतके फटकावताना संघाचा डावही सावरला व विजयही दृष्टिपथात आणला. या दोघी बाद झाल्यावरही मेरिजेन कॅपने नाबाद 36 तर, नॅन्डिन डी क्लर्कने नाबाद 19 धावा करत संघाचा विजय साकार केला.
राजेश्वरी गायकवाडने केवळ 13 धावांच्या बदल्यात तीन गडी बाद केले मात्र, अन्य गोलंदाजांना अपयश आल्याने त्यांना विजयापासून वंचित राहावे लागले.