पुणे – बहुप्रतीक्षित अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या द पूना क्लब गोल्फ लीग-२०२४ स्पर्धेत आकाश नखरे (६३पॉईंट्स, मानव पारी पिन सीकर्स), आदित्य गर्ग (६० पॉईंट्स, केके कोठारी रॉयल्स), अविनाश देऊस्कर (५३ पॉईंट्स, शुबान सनरायजर्स), जान्या बिष्णोई (४२ पॉईंट्स, व्हॅस्कॉन द होली वन्स) हे महागडे खेळाडू ठरले आहेत. या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पूना क्लब गोल्फ कोर्सवर अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली.
या स्पर्धेच्या पाचव्या सत्राचा औपचारिक, पण तितकाच शानदार प्रारंभ या लिलावातून झाला. यावेळी सर्व संघमालकांचा हार्दिक सत्कार करण्यात आला. लिलावासाठी एकूण ३१६ खेळाडू उपलब्ध असल्याचे जाहीर करण्यात आले. संघमालकांनी या खेळाडूंमधून गोल्ड, सिल्व्हर व ब्राँझ या तीन स्तरांवर आपल्याला हव्या त्य खेळाडूंची निवड करणे अपेक्षित होते. प्रत्येक संघाला त्यासाठी दोन कोटी रुपयांची मर्यादा होती व सर्वाधिक चुरस असलेल्या गोल्ड गटातून ९० खेळाडूंची निवड विविध संघांनी केली.
सर्व संघांनी मिळून एकूण २४० खेळाडूंची लिलावातून निवड केली. हे खेळाडू या स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी बजावतील, तसेच हे सर्व खेळाडू एकमेकांशी झुंज देताना स्पर्धा रंगतदार बनवितील, असा विश्वासही संघमालकांनी व्यक्त केला.