सत्तेसाठीच पश्‍चिम बंगाल मध्ये राजकीय हिंसाचार – सरसंघचालक मोहन भागवत

नागपुर – सत्तेच्या हव्यासापोटीच पश्‍चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराच्या घटना घडत आहेत अशी टीका सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे. त्यामुळे तेथील सरकारने लोकांच्या हितासाठी कार्यरत राहणे गरजेचे असून त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत ठेवली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही त्या राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय हिंसाचार घडत असून त्याबद्दल त्यांनी पश्‍चिम बंगाल सरकारला जबाबदार धरले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रक्षिण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की आज पश्‍चिम बंगाल मध्ये जे काही घडते आहे त्याबद्दल तेथील सरकारला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांना बाहेरचे म्हणणे पुर्ण चुकीचे आहे असेही त्यांनी यावेळी निक्षुन सांगितले. ममता बॅनर्जी यांनी बंगाल बाहेरचेच लोक येथे येऊन राजकीय हिंसाचार माजवत आहे असा आरोप वारंवार केला आहे. त्या अनुषंगाने सरसंघचालकांनी हे विधान केले. ते म्हणाले की आज पश्‍चिम बंगाल मध्ये जे काही घडते आहे तसे तेथे याआधी कधी घडले नव्हते आणि अन्य राज्यातही इतक्‍या मोठ्या प्रमाणात राजकीय हिंसाचार पहायला मिळत नाही. राज्य सरकारने तातडीने या हिंसाचारावर नियंत्रण आणून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अयोध्येतील राम मंदिराच्या विषयावर बोलताना ते म्हणालेकी केंद्रातील सरकारने लोकांची आश्‍वासन पुर्ती केल्याने लोकांनी त्यांच्यावर पुन्हा विश्‍वास दाखवला आहे पण त्यांची काही आश्‍वासने अजून पुर्ण व्हायची आहेत. ते म्हणाले की संघ आणि समाज प्रत्यक्ष राजकारणात नसतो पण आम्ही मतदार असतो.

देशात शंभर टक्के मतदान नोंदवले जावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याची चांगली फळे दिसून आली आहेत. आज मतदानाचे प्रमाण शंभर टक्के इतके होत नसले तरी ते वाढले आहे. आणि लोक आता प्रत्येक निवडणुकीत अधिक जबाबदारपणे मतदान करताना दिसून येत आहेत असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.