गडचिरोली – गडचिरोलीतील उत्तर- पूर्व भागात छत्तीसगड सीमेजवळील परिसरात शनिवारी सकाळपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत पाचहून अधिक नक्षलवादी ठार झाले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात चकमक सुरूच होती. चकमकीत नक्षलवाद्यांचे ठिकाण उद्ध्वस्त करण्यात आले असून काही नक्षलींचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरची तालुक्यामधील ग्यारापत्ती, कोटगुल परिसरातील जंगलात नक्षलवाद्यांचे शिबिर लागले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या सी-60 पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र करत त्या भागाकडे मोर्चा वळविला. पोलिसांच्या पथकाची चाहुल लागताच नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला पोलिसांकडून प्रत्युत्तर देण्यात आले. या चकमकीत पाचहून अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत. ऑपरेशन अजून संपले नसल्यामुळे त्याविषयी अधिक माहिती सांगता येणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.