देहूरोड, (वार्ताहर) – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी संचलन केले. मंगळवारी (दि. 12) सकाळी पार पडलेल्या या संचलनात 17 अधिकारी आणि 107 अंमलदार सहभागी झाले.
संचलचाची सुरुवात शिवाजी विद्यालय देहूरोड येथून झाली. हे संचलन पुढे जामा मशिद, आंबेडकर नगर, स्वामी चौक, सुभाष चौक, वृंदावन हॉटेल, रेल्वे स्टेशन, सवाना चौक, नेटके कॉलनी, विजडम स्कूल, विकास मेडिकल मार्गे, मुकाई चौक, येथे शांततेत पार पडले.
यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्यासह पाच पोलीस निरीक्षक, 11 सहाय्यक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, तसेच देहूरोड, रावेत, शिरगाव, तळेगाव, मुख्यालयातील दोन आरसीपी पथक तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स कडील यूएआयडी 830 क्रमांकाची कंपनी असे मिळून एकूण 17 अधिकारी व 107 अंमलदार सहभागी झाले होते.
देहूरोड पोलीस ठाण्यातील बीट मार्शल, डायल 112, देहूरोड, रावेत, शिरगाव व तळेगाव कडील मोबाईल 1 वाहन, देहूरोड मोबाईल 2, मोबाईल 3 वाहने देखील सहभागी झाली होती.
आगामी निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी पोलिसांनी सर्व स्तरावर तयारी सुरू केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांची पाहणी केली जात आहे. तसेच संबंधितांसोबत बैठका घेऊन तयारीचा आढावा घेतला जात आहे. त्याचबरोबर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जात आहे. आता पोलिसांनी संचलनालाही सुरुवात केली आहे.