पुणे – शहरातील मार्गावर पीएमपी बसची संख्या वाढली आणि प्रवाशी संख्येबरोबरच पीएमपीच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली. गतवर्षीच्या जुलै आणि ऑगस्ट 2022 या महिन्यातील उत्पन्न काढले तर यंदा तब्बल दहा कोटीने उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येते. तर प्रवाशी संख्येतही चार ते साडेपाच लाखांनी वाढ झाली आहे.
पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 181 बस आहेत. त्यातील 1700 ते 1800 बसगाड्या 378 मार्गावर दररोज धावतात. त्याद्वारे 10 ते 12 लाख प्रवासी प्रवास करतात. यातून पीएमपीला दैनंदिन दीड कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळते. पीएमपीचे नवे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदभार घेतल्यानंतर प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी, तत्काळ आणि विना तक्रार प्रवास होण्यासाठी सिंह यांच्याकडून यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.
त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली असून, जास्तीत जास्त बस मार्गावर उतरवल्या आहेत. त्याचा परिणाम प्रवासी संख्या आणि उत्पन्नवाढीवर झाला आहे. दरम्यान, प्रवासांसाठी आणखीन बस खरेदी करण्यात येणार असून, त्यामध्ये सीएनजी आणि इलक्ट्रिक बसची खरेदी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात पुणेकर नक्कीच सार्वजनिक वाहतुकीचा प्राधान्याने वापर करतील, असा विश्वास पीएमपीकडून व्यक्त केला जात आहे.
2022 आणि 2023 मधील प्रवासी आणि उत्पन्न यातील वाढता आलेख
वर्ष महिना एकूण प्रवासी संख्या एकूण उत्पन्न
2022 जुलै 3,17,01,065 42,88,31,885
2023 जुलै 3,56,42,963 52,61,23,680
2022 ऑगस्ट 3,45,27,304 47,04,89,949
2023 ऑगस्ट 4,00,70,662 57,08,69,133