औंध – बाणेर परिसरात रात्री झालेल्या पावसामुळे बाणेर रस्ता पूर्ण पाणीमय झाला. बाणेर रस्त्यावर पाणी साचले. या पाण्यामधून वाट काढताना चालकांना कसरत करावी लागली. अनेक, दुचाकी बंद पडल्या. गाडी बंद पडल्यामुळे अनेकांना ढकलत न्यावी लागली. बाणेर रोड परिसरातील व्यावसायिकांच्या दुकानांसमोर पाणी साचून राहिले. याचा परिणाम व्यवसायावर झाला. प्रत्येक पावसात बाणेर रस्त्यावर पाणी साचत असल्याने महापालिकेला यावर उपायच शोधता येत नसल्याचे उघड आहे.
मेट्रोच्या कामचा फटका
बाणेर रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे, अनेक ठिकाणी मेट्रो प्रशासनातर्फे खोदाई करण्यात आली आहे. रस्त्याच्या मध्यभागी पत्र्यांचे दुभाजक टाकून आतमध्ये काम करण्यात येते. या दुभाजकाला पाणी आडल्यामुळे रस्त्यावरच पाणी साचून राहते. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने पाणी साचून वाहतूक कोंडी होत आहे.
चेंबरची उंची अधिक
महापालिका प्रशासनातर्फे देखील रस्ते करताना पावसाळी पाण्याची लाइनचे चेंबर अनेक ठिकाणी उंचावर करण्यात आलेली आहेत, त्यामुळे त्यामधून पाणी न जाता रस्त्यावरच पाणी साचून राहत आहे. मागच्या पावसात काही ठिकाणी असे चेंबर पाणी जाण्यासाठी फोडण्यात आले होते, त्यानंतरही त्यामध्ये दुरूस्ती अद्यापही झालेली नाही.
कोट्यवधींचा निधी
बाणेर रस्त्यावर अनेक वेळा रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला. महापालिकेतर्फे तर या ठिकाणी रस्त्याची कामे करताना पुणे स्मार्ट सिटीतर्फे खुल्या हाताने कोट्यवधी रुपये खर्चू करून रस्ते करण्यात आले आहेत. परंतु, निकृष्ट आणि त्रुटी असल्याने पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत.