PM Modi in winter session 2023 – संसदेत तरुणांची घुसखोरी, विरोधकांची सभागृहात तीव्र निदर्शने त्यानंतर खासदारांचं घाऊक निलंबनं यांमुळे हिवाळी अधिवेशन चांगलंच तापलं आहे. लोकसभेत सुरक्षा व्यवस्था भेदून झालेल्या घुसखोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात भाष्य करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. अशातच आज (गुरुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी खुसखूर्च्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच सभागृहात हजर राहिल्याचे पाहायला मिळाले.
…अशी झाली पंतप्रधान नरेंद्र मोदींची इंट्री
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर बोलत असताना पंतप्रधान मोदी यांची दुपारी चारच्या सुमारास सभागृहात इंट्री झाली. पंतप्रधान येताच टाळ्या, जय श्रीरामचा जयघोष तसेच भारत माता की जय अशा घोषणा देत त्यांचे स्वागत सत्ताधारी पक्षातील खासदारांनी केले. यानंतर पंतप्रधान सर्वांना नमस्कार करत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या बाजूच्या आसनावर जाऊन बसले.
त्यानंतर जेमतेम दहा मिनिटे सभागृहाचे कामकाज चालले. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार की नाही, याबाबत उत्सुकता असतानाच माहिती व प्रसारण मंत्रालयाचे एक विधेयक पारित झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर वंदे मातरम झाले, पंतप्रधानांनी नमस्कार केला आणि लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.
पंतप्रधान बोललेच नाहीत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभागृहातील भाषण हे विरोधकांचा खरपूस समाचार घेणारे असते. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात दाखल झाल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र त्यापूर्वीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिवाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना नमस्कार घेत सभागृहाचा निरोप घेतला.
खासदारांचे घाऊक निलंबन
विरोधी पक्षाच्या खासदारांचे घाऊक निलंबन करण्यात आल्याने हिवाळी अधिवेशन चांगलेच तापले. आतापर्यंत राज्यसभा व लोकसभाच्या एकूण १४६ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आज विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारतर्फे मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप करत संसदेपासून विजय चौकापर्यंत सरकारविरोधात रॅली काढली. खासदारांचे निलंबन हे हिवाळी अधिवेशनापर्यंतच करण्यात आले आहे.