- आतापर्यंत 49 हजार 748 दिवे बसविले : दरमहा देणार 50 लाख रुपये
पिंपरी – महापालिकेच्या विविध भागांमधील रस्त्यांवर उर्जा बचत करणारे आतापर्यंत 49748 दिवे बसविण्यात आले आहेत. तर आणखी 33743 एलईडी पथदिवे बसविण्याचे नियोजन करण्यात आले. हे पथदिवे बसविण्यासाठी एजन्सीला दरमहा 50 लाख रुपये अदा करणार आहे, अशी माहिती महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
राज्य शासनाच्या नगर विकास विभागामार्फत नॅशनल स्ट्रीट लाईट प्रोग्राम (NSLP) अंतर्गत उर्जा बचतीच्या अनुषंगाने पारंपारिक पथदिव्यांच्या ठिकाणी उर्जा बचत करणारे एलईडी पथदिवे बसविणेकरीता केंद्र शासनाच्या विद्युत मंत्रालयाच्या अंगीकृत उपक्रम असलेल्या एनर्जी इफिशिएंशी सर्व्हिस लिमिटेड (EESL) या कंपनीच्या माध्यमातून एलईडी दिवे बसविणेकरीता करारनामा केलेला आहे.
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचा 4 जून 2018 च्या शासन निर्णयानुसार यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांनी पारंपारिक दिव्यांच्या ठिकाणी एलईडी दिवे खरेदी न करता एनर्जी एफिशिएंशी सर्व्हिस लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून उर्जा बचत करणारे एलईडी दिवे बसविणे बंधनकारक केले आहे.
याकरीता महापालिकेकडून बसविण्यात आलेल्या एलईडी पथदिव्याव्यतिरिक्त दिव्यांच्या ठिकाणी ईईएसएल च्या माध्यमातून एलईडी पथदिवे बसविणेकामी पिंपरी चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभा व स्थायीचीदेखील सप्टेंबर 2019 रोजी मान्यता मिळाली आहे.
ईईएसएल या कंपनीच्या माध्यमातून पिंपरी महापालिकेच्या रस्त्यावरील पारंपारिक पथदिवे बदलून त्याऐवजी उर्जा बचत करणाऱ्या एलईडी फिटींग बसविणेकामी रस्त्यावर,उद्यान व खेळांचे मैदान इ.ठिकाणी पथदिव्यांचा सर्वेचे काम करण्यात आलेले असून विविध प्रकारचे व क्षमतेचे मिळून पथदिव्यांची संख्या एकूण 83491 आहे. सन 2012-2013 पासून महापालिकेमार्फत उर्जा बचत करणारे 49748 इतके एलईडी दिवे बसविणेत आलेले आहेत. व उर्वरीत 33743 एलईडी पथदिवे बसविणे अद्यापही बाकी आहे.
पुढील तीन महिन्यांत पूर्ण होणार काम
पारंपारिक दिवे काढून एलइडी पथदिवे बसविताना 50 टक्के उर्जा बचत होईल व सध्याच्या दिव्यांच्या रस्त्यावरील प्रकाशा इतकेच किंवा त्यापेक्षा जादा प्रकाश पडेल. या क्षमतेचे दिवे बसविण्यात येणार असून बदलण्यात येणाऱ्या दिव्यांच्या संख्येनुसार वीजयुनीट मध्ये किमान 50 टक्के बचत होणार आहे. ईईएसएल मार्फत पुढील आठवड्यात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम सुरू करण्यात येत असून त्यापुढील तीन महिन्यात काम पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाकरीता महापालिकेस सुरवातीस कोणताही खर्च करावा लागणार नाही. या प्रकल्पासाठी एकूण अंदाजे 40 कोटी खर्च अपेक्षित आहे. बसविण्यात येणाऱ्या दिव्यांच्या वॅटेज व संख्येनुसार सर्व करासह येणाऱ्या खर्चाच्या एकूण रकमेनुसार 84 हप्त्यामध्ये महापालिकेकडून प्रत्येक महिन्याला ईईएसएल यांना अंदाजे 50 लाख एवढे बिल अदा करणार आहे.