मेलबर्न – भारताची नवोदित टेनिसपटू अंकिता रैना हिला यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पात्र ठरण्यात अपयश आले. तीला पात्रता स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्बियाच्या ओल्गा डॅनिलोव्हिचकडून पराभवाचा सामना करावा लागला.
या ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेची मुख्य फेरी गाठण्यात अंकिताला संपूर्ण कारकिर्दीत सहाव्यांदा अपयश आले. दुबईत महिला एकेरीच्या पात्रता फेरीचा अंतिम सामना जवळपास दोन तास रंगला. त्यात ओल्गाने 6-2, 3-6, 6-1 असा अंकिताचा पराभव केला.
दरम्यान, पुरुष एकेरीच्या पात्रता फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताचा अव्वल टेनिसपटू रामकुमार रामनाथनचेही आव्हान संपुष्टात आले, तर प्रज्ञेश गुणेश्वर दुसऱ्या फेरीत पराभूत झाला. त्यामुळे आता वर्षांतील पहिल्या ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या एकेरीत सुमित नागलचे एकमेव आव्हान भारताकडून असेल. त्याला थेट प्रवेश देण्यात आला आहे.