11 बंदच : शंभर टक्के क्षमतेने तलाव सुरू करण्याची मागणी
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेचे 13 जलतरण तलाव आहेत. त्यापैकी केवळ दोनच सध्या सुरू असून उर्वरित तलाव सुरू करण्याची मागणी होत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून तलाव बंद होते. त्यामुळे सराव करणाऱ्यांना तसेच नियमित पोहायला जाणाऱ्यांची अडचण होत होती. डिसेंबरमध्ये काही तलाव 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यात आले. मात्र, सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे नागरिकांकडून तलाव सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने देखभाल दुरुस्तीची कामे सुरू केल्याने उर्वरित जलतरण तलाव सुरू होण्यास कलावधी लागणार असल्याचे सहाय्यक आयुक्त, क्रीडा अधिकारी सुषमा शिंदे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. मात्र, तलाव बंद आहेत. भोसरी, सांगवी, थेरगाव, मोहननगर, चिंचवड येथील तलावाची कामे खूप आहेत. त्यामुळे ते सुरू होण्यास वेळ लागणार आहे.
सुषमा शिंदे म्हणाल्या की, दोन वर्ष तलाव बंद होते. त्यामुळे अनेक मशनरींची दुरुस्ती करावी लागत आहे. तसेच फिल्ट्रेशन, टॅक भरणे, त्याची दुरुस्ती करणे आणि इतर कामे सुरू आहेत. एका तलावात 20 लाख लिटर पाण्याची क्षमता असते. ते भरण्यास वेळ लागतो. भरल्यावर तलाव सुरू करण्यात येणार आहेत. शंभर टक्के क्षमतेने तलाव सुरू करण्यात मान्यता मिळाल्याने ते लवकरच सुरू होतील. लीपिक, जीवरक्षकांच्या नियुक्त्या केल्या जातील. तलाव भरणे, इतर किरकोळ दुरुस्ती करणे सुरू आहे. कामे होताच टप्प्याटप्प्याने तलाव सुरू करण्याचे नियोजन आहे.