पिंपरी, दि. 18 (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहर परिसरात सोमवारी रात्री दमदार पावसाने हजेरी लावली. परतीचा हा पाऊस जाता-जाता शहराला चांगलेच झोडपून काढत आहे. संपूर्ण पावसाळ्यात एवढा मुसळधार पाऊस पडला नव्हता, तेवढा सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. मंगळवारी सायंकाळी घेतलेल्या गेल्या 24 तासांतील आकडेवारीनुसार शहरात 53.5 तर पवना धरण क्षेत्रात 98 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
शहरात वाकड आणि रहाटणी येथे दोन ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. तसेच दुचाकी घसरल्याच्या ही घटना घडल्या आहेत. दत्त मंदिर रोड, वाकड आणि संत गोरा कुंभार कॉलनी रहाटणी येथे दोन झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. वाकड येथील घटनेत एक झाड सोसायटीच्या भिंतीवर पडले. तर रहाटणी येथे रस्त्याच्या बाजूला झाड पडले. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला नाही.
चिंचवडमध्ये मंगळवारी सायंकाळपर्यंत गेल्या 24 तासांत 53.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. डुडुळगाव येथे 31, तळेगाव 31 आणि पवना धरण परीसरात 98 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सुदैवाने कुठेही घरात पाणी शिरण्याचे तसेच जनजीवन विस्कळीत होण्याचा प्रकार नाही. मागील आठवडाभरात रविवार वगळता दररोज पाऊस पडत आहे. शहरात ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत सुमारे 250 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर मंगळवारी दुपारपर्यंत आकाश मोकळे झाले होते. परंतु दुपारी तीन नंतर पुन्हा ढग दाटून आले आणि हलक्या सरी कोसळू लागल्या.