शिक्रापूर – करोनाचा फैलाव जसा सुरू झाला होता तेव्हापासून त्याचा फैलाव रोखण्यामध्ये पिंपळे खालसा (ता. शिरूर) गावाला यश आलेले असताना नुकताच गावामध्ये करोनाचा शिरकाव होऊन एकाच कुटुंबातील सात जणांना लागण झाली असल्याने गाव हादरले आहे.
पिंपळे खालसा येथील एक युवक सणसवाडीतील एका कंपनीत कामाला असून त्याला काही त्रास जाणवू लागला; मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याच्या वडिलांना त्रास जाणवल्याने त्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि पिंपळे खालसा गावामध्ये करोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले. त्यपाठोपाठ त्यांच्या मुलाने तपासणी केली असता त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने या दोघांना शिरूर व पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
दरम्यान, आरोग्य विभागाने या कुटुंबातील आठ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून आठ जणांपैकी पाच पॉझिटिव्ह तर तिघांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पिंपळे खालसा येथील एकाच कुटुंबातील बाधितांची संख्या सात झाली आहे.
या रुग्णांची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य विभागाचे डॉ. महेश लकडे, पिंपळे खालसाच्या ग्रामविकास अधिकारी शीतल भालसिंग यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रुग्ण राहत असलेल्या परिसरात औषध फवारणी करीत निर्जंतुकीकरण केले आहे.