पुणे – घराच्या टेरेसवर बसलेले कबुतर पकडून पिंजऱ्यात ठेवल्यामुळे एका अल्पवयीन मुलावर तिघांनी कोयत्याने वार केले. हा प्रकार बुधवारी पावणेपाच वाजता वडगाव बुद्रुक येथील जाधवनगर येथे घडला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
फिर्यादीच्या घराजवळील परिसरात एका मुलाने कबुतरे पाळली आहेत. एक महिन्यापूर्वी त्याच्याकडील कबुतरांपैकी एक अल्पवयीन मुलाच्या घराच्या टेरेसवर येऊन बसले. त्यावेळी अल्पवयीन मुलाने ते पकडून पिंजऱ्यामध्ये ठेवले. दरम्यान, हा प्रकार कबुतरे पाळणाऱ्या मुलाने पाहिला. त्यावेळी त्याने त्याच्या मित्रासमवेत येऊन अल्पवयीन मुलास शिवीगाळ करीत मारहाण केली.
दरम्यान, बुधवारी अल्पवयीन मुलगा त्याच्या दोन मित्रांसमवेत मोबाइलवर खेळत बसले होते. त्यावेळी कबुतरे पाळणारा मुलगा हा त्याच्या दोन साथीदारांसमवेत तेथे आला. त्याने एक महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीच्या हात, मनगट, पायावर कोयत्याने वार केले.
मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या मित्रांनी प्रयत्न केले, मात्र तिघांनी त्याच्या मित्रांनाही मारहाण केली. काही वेळाने हा प्रकार पाहून तेथील नागरिक जमू लागले. त्यावेळी संशयित आरोपींनी तेथून पळ काढला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए. बी. काळे करीत आहेत.