मुंबई- नागपूर महामार्गावरील तालुक्यातील संवत्सर शिवारात गुरुराज पेट्रोल पंपावर येथे गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तीन व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत पेट्रोल भरण्यासाठी आले असता किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीत पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक भोजराज बाबुराव घनघाव (वय 40 रा. दहेगाव बोलके ता.कोपरगाव) याच्या खांदा पोटावर चाकूने सपासप वार करून खून केला तर जवळ असलेल्या एक हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या संतोष सदन मोरे (वय 38) यांच्यावर ही चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
दरम्यान, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या घटनेतील दोघांना चोवीस तासाच्या आत अटक केली असून एक जण मात्र फरार झाला आहे. दरम्यान पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, चाकूने हल्ला करणारा मुख्य आरोपी साहिल विजास गुंजाळ (वय 21 रा. शिर्डी) त्याचा साथीदार आदित्य गंगाधर रुचके (वय 21 रा. दहेगाव बोलका ता. कोपरगाव) आणखी एक साथीदार नाव समजू शकले नाही. हे तिघे मोटारसायकल (क्र एम एच 17 सीडब्लू 9104) वरून राञी शिर्डीकडे जात असताना रस्त्यात संतोष मोरे यांच्या गाडीला धक्का मारला होता. पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी तिघे आरोपी थांबले. त्याच हॉटेलमध्ये धक्का लागलेले मोरे हे देखील आले. तेथे त्याच्याशी बाचाबाची झाली असता आरोपी साहिल गुंजाळ याने मोरे यांच्यावर चाकूने पोटामध्ये वार करून गंभीर जखमी केले. जखमी मोरे यांना लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या तिघांनी जवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरणाऱ्या एका कर्मचाऱ्याबरोबर किरकोळ कारणावरून धक्काबुक्की सुरू केली. इतक्यात पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक भोजराज घनघाव यांनी माझ्या कर्मचाऱ्याला का मारताय असा जाब विचारत साहिलच्या कानशिलात लगावली. साहिल याने कोणताही मागचा पुढचा विचार न करता घनघाव यांची गचंडी धरून चाकुने सपासप वार करायला सुरुवात केली. तब्बल सात वेळा चाकूने वार करून घनघाव यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडले. जवळ असलेले घनघाव यांचे पाच ते सहा साथीदार ही घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत होते पण एकानेही आरोपीला पकडण्याचे धाडस केले नाही किंवा प्रतिकार करुन घनघाव यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.
सहा जणांच्या साक्षीने एका साहिल गुंजाळने घनघाव यांचा खून करून आपल्या साथीदारांसह गाडीवर आरामात निघून गेला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक रामराव ढिकले पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच पोलीस निरीक्षक ढिकले यांनी मारेकऱ्यांच्या शोधासाठी तीन पथके तय्यार करून सुर्योदयाच्या अगोदर मुख्य आरोपी साहिल विजास गुंजाळ याला नाशिक येथुन तर,आदित्य गंगाधर रुचके याला शिर्डी येथून गजाआड केले. गुरुराज पेट्रोल पंपाचे कर्मचारी अमोल धोंडीराम मोहिते यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आरोपींच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, भरत दाते, पोलीस कर्मचारी जालिंदर समनर, संभाजी शिंदे, गणेश मैड, राम खारतोडे, गणेश काकडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.