पिंपरी – वाहतूक पोलीस सहकार्य करीत नसल्याचे कारण देत महापालिकेने पे ऍण्ड पार्क योजना बंद केली होती. ती योजना पुन्हा येत्या शनिवार (दि.19) पासून सुरू करण्यात येणार आहे. पार्किंग व नो-पार्कींगची ठिकाणे जाहीर करण्यात आली आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रिक्षा स्टॅण्डचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तेथे इतर ठिकाणी हटविले जाणार आहे, असा निर्णय महापालिका व पोलिस अधिकाऱ्यांच्या वाहतुक समस्या व पार्किंग पॉलिसी विषयावरील बैठकीत सोमवारी (दि.14) घेण्यात आला.
बैठकीस पालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड, प्रेरणा सिनकर, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, डॉ.सागर कवडे, सतीश माने व अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.
बहुतेक चौकांमध्ये व महत्वाच्या रस्त्यावर रिक्षा स्टॅण्ड असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. ते स्टॅण्ड हटविण्यात येणार आहेत. पदपथावरील अतिक्रमण त्वरीत हटविण्याचे व अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त पाटील यांनी दिले. पालिकेच्या मिळकती पोलिसांना वापराकरिता भाड्याने देण्यात आल्या आहेत. त्या मिळकतींच्या वापराबाबत प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यात यावी, अशी सूचना आयुक्त पाटील यांनी दिली.